श्री गजानन महाराज स्तोत्र
ॐ नमोजी गजानना | गणिगणगणात दयाघना
कृपानिधे, तवचरणा | वंदुनि स्तवन करितसे ||१||
तूचि विठ्ठल, तूचि अनंता | ओंकारेश्वर, परमहंसा
रामदास, अवधूता | विकल्पदहना, सद्गुरो ||२||
माघ वाद्य सप्तमीशी | प्रगटुनि शेगावाशी
अज्ञान तिमिराच्या राशी | नष्ट तूची केल्यास ||३||
भास्कराच्या विहिरीला | स्पर्श जेंव्हा तुझा झाला
जीवनझरा उसळला | सकल जनांच्या तृषेस्तव ||४||
भक्त पितांबराच्यासाठी | झालास तू चैतन्य राशी
वठलेल्या आम्रवृक्षासी | नवपालवी फुटतसे ||५||
पोरांनी जरी मारिले | सारे तुवा सहन केले
प्रेम रसाचे पाट वाहिले | तूचि माउली गजानना ||६||
बंकटलालाच्या मळ्यात | मधमाशांना उठविलेत
कोणी न धावती संकटात | हेच पटविले त्या समयी ||७||
वासूदेवानंद सरस्वती | येता तव आश्रमाप्रती
त्रिमार्गातील मुक्ती | समान हे त्वा दाविले ||८||
माघ-वद्य नवमीला | रामदास तुम्ही बनला
विठ्ठल बनुनी बापुनाला | देवभेटी घडविली ||९||
लोक म्हणती चमत्कार | हे तर कृतियुक्त आचार
भक्ताशी केले साक्षर | अध्यात्माचे मार्गावर ||१०||
जेथे श्रद्धा आणि भक्ती | तेथे येतसे उदात्त शक्ती
सद्भावाची येई प्रचीती | हेच ठसवले गजानने ||११||
ब्रह्मगिरी गोसाव्याला | खरा ज्ञानी तुम्ही केला
कोरड्या त्याच्या पांडित्याला | तुम्ही सश्रद्ध बनविले ||१२||
लोकमान्य टिळकाशी | प्रेरणा दिव्य तूची देशी
कैदेत असता मंडाल्याशी | गीतारहस्य निर्मियले ||१३||
सामान्यासी तू सामान्य | पंडितांना असामान्य
भक्तजनांना तूचि धन्य | धन्य बनविले गजानना ||१४||
दिनांचा तुम्ही आधार | सुशिक्षितांना दिलात धीर
मोक्षमार्गाचा उद्धार | केलात पुन्हा कलियुगी ||१५||
तुमच्या चरित्राचे सार | नाम महिमा अपार
एकचि आहे ईश्वर | रूपे जरी वेगळाली ||१६||
नुसती विद्वत्ता न ये कामी | संपत्ती जरी असे धामी
जनहितास्तव ये जे कामी | त्याच सत्कृति या जगती ||१७||
गजाननाचे आचार | साक्षात असति सदाचार
मुखाने करावा उच्चार | उच्चार तुम्हा तारतील ||१८||
नामभक्तीचा हा ठेवा | सत्कृति आचरणी आणाव्या
तरीच गजानन-मार्गा | आचरण आपले मानावे ||१९||
या स्तोत्राचा पाठ | चालेल ज्याच्या घरात
गजाननाचा वरदहस्त | सदैव पाठीशी राहील ||२०||
एकवीस श्लोकांची ही माला | आदरे अर्पिली गजाननाला
समर्थ बनवील भक्ताला | हीच फलश्रुति नि:संशय ||२१||
||श्री गजाननार्पणमस्तु ||
गजानन महाराज स्तोत्राची ही रचना नामभक्ती बरोबर कुतियुक्त आचरणासाठी गजानन महाराजांनी दिलेली प्रेरणा संप्रेरित करणारी आहे. त्यांच्या सत्कृतीच्या आठवणीतून आपणही कृतीप्रवण होत जावे व कर्तबगार बनावे ह्या अपेक्षा या स्तोत्राच्या नित्य पठणातून साकार होतील.
वि. मो. दुधगांवकर
(प्रस्तावने मधील एक परिच्छेद)