Tuesday, October 14, 2014

पिल्लू माझं करतंय काय...


पिल्लू माझं करतंय काय
ओठांचा चंबू गालांची साय
हेलिकॉप्टर होते हातांचेे
पायांचा रेटा सोसते माय

पिल्लू माझं करतंय काय
मायेच्या कुशीत बसून हळूच
दोन्ही हातांच्या मुठी वळीत 
मच् मच् दुद्दू पितच जाय

पिल्लू माझं करतंय काय
मायेच्या मांडीवर थोपटून घेईत
मनातल्या मनात गाणी म्हणीत
लुकलूक डोळे करीतच -हाय

पिल्लू माझं करतंय काय
निळ्या निळ्या पाळण्यात झोके घेईत 
हवेत पायांची सायकल चालवीत 
हाताची बोटे चाखत जाय

पिल्लू माझं करतंय काय
आईचे बोट घट्ट धरीत 
हळू हळू अलगद डोळे मिटीत
बाबांच्या स्वप्नात धावत जाय, बाबांच्या स्वप्नात धावत जाय...