Tuesday, December 29, 2009

Sangharsh Bindu

I found a notebook with my late father's hand writing just two day back. For me it was a lost-treasure-found. I oversaw the content and found many notes. Several of them were elaborate. A particular one was a short story based on a real incident in his life. He has narrated his feelings and general atmosphere around him during those days. I think that the story is a mirror that reflects his mind and also the subtle ways, in which he has reacted to his son's adventures. The story also reflects how he has fought over concern arising out of some risks and has replaced it with a welcoming enthusiasm. It also plays a mirror for his son! I am posting the original Marathi script here.

संघर्षबिंदू
विनायक मोरेश्वर दुधगांवकर

संघर्ष हा कथेचा आत्मा असतो. कथेत निर्माण केलेला प्रश्न व त्याची सोडवणूक यावरच कथेचा गोडवा, औत्सुक्य अवलंबून असते. हे कथेचे तंत्र आणि कथेचा मंत्र. महाभारतातील प्रत्येक प्रसंग आणि संपूर्ण महाभारतच त्याचे सार्थ उदाहरण आहे. पण आपल्या ही छोट्याशा सीमित जीवनातही अनेक प्रसंग येत असतात, घडत असतात. ते मोठे नसतात. पण त्याची कथा मात्र बनू शकते हे निश्चीत.

आमच्या प्रसादने (मुलाने) बुलेट घेतली. घेतली ती मद्रास मध्ये. लहानपणी ल्यूना वर तो बसला, माझ्या पूर्वीच्या लॅंब्रेटा स्कूटरवरून तो पुढे उभा राहूनच फिरला. मग सायकल शिकला. मग घरी M50 आली. ती त्याने चालवली. M80 आली. अवंती (ऑटोगियर) आली. आणि त्याच्या आईने ख़ास त्याच्या साठी त्याच्या मामाची इंड सुझुकी घेवून दिली. तेव्हा तो I.I.T. मध्ये M.Tech. करीत होता. पुढे तो टेल्को मध्ये आल्यावर त्याने सुझुकी घरी पाठवली व नवे सुझुकी फिएरो घेतली. मोठे भारदस्त वाहन. भरपूर वापरले आणि Ph.D. साठी मद्रासला गेल्यावर ते मद्रासला नेलेले इकडे आणले व दिले. सायकल वापरीत होता. पण वाहन न वापरण्याचा उत्साह ओसरला असावा. प्रसादचा एक दिवस फोन.

"बाबा, मी बुलेट घेतोय. आई, ऐकतेयस ना?"
"किंमत किती?" मी.
"एकूण ८० हजार पडतील," प्रसाद.
मी गप्प. फोनवर त्याची आईशी चर्चा. मी गप्पच.
"बाबा बोलत का नाही? गप्प का?" प्रसाद.
मी हसतच सांगितले "कर्ज काढून तू घेतोस, घे. हे धाडस तरूणपणातच शोभते." वगैरे वगैरे.

प्रसादने बुलेट घेतली. तो कुठे कुठे गेला हे फोन वरून कळायचे.

६ फेब्रुवारी २००४. प्रसाद आज मद्रास वरून निघणार असे फोनवर काही दिवस आधी बोलला होता. सकाळ पासून त्याचा फोन असा नव्हताच. मी ही दोन तीन वेळा फोन केला होता पण फोन लागत नव्हता. लागला तेव्हा कळाले, तो मद्रासहून निघाला आहे. सकाळी लवकर. फक्त... बुलेटने निघाला आहे!

वार्ता घरात पसरली. किती मोठे अंतर. नवीन गाडी. एकटा येणार? वगैरे वगैरे. M80 वरून फार तर एका खेपेत मिरज, कवठे, तासगांव, भिलवडी, आष्टे, वडगांव करून परत गंगानगरी आलो की मोठा प्रवास केला असे मानणारे आम्ही. विचारानेच छाती दडपून जावी. झाले! सर्वच अस्वस्थ झालो.

सायंकाळी त्याने चित्रदुर्ग मधल्या एका हॉटेल मध्ये मुक्काम केला. दुसरे दिवशी सकाळी सव्वासहा वाजता मी त्याला फोन करून उठवले. तेथून हुबळी-धारवाड, बेळगांव व निपाणी मार्गे सहा पर्यंत सहजीवनमध्ये, असे त्याचे नियोजन. दुपारी फोन आला की हुबळीत जेवण केले आहे आणि तिथून निघतो आहे.

बेळगांव मध्ये पोचलो असा चार वाजता फोन. पुढचा फोन साडेसहा वाजता. "मी निपाणीजवळ आलो आहे. उशीर झाला आहे. वाटेत छोटासा अपघात झाला होता. मला व गाडीला काही झाले नाही. रस्ता ओलांडणार्‍या गुरांच्या कळपाला ट्रकने धडक दिली होती. आल्यावर सविस्तर सांगतो."

सायंकाळी अप्पा नुली आलेले, मिलिंदही आलेला. प्रथम मीही कशाला हे धाडस केले म्हणणारा. मात्र नंतर मीही पेढे आणले. हार सूर्यवंशी मेस्त्रींनी आणला. आरतीची तयारी केली. कशाला हे धाडस केले हा सर्वांचा सूर मी थांबविला व आता तो इतक्या लांबून येतो आहे, त्याच्या धाडसाचे कौतुक करुया म्हणून सांगितले. प्रसाद तसा उशीरा आला. पण त्याचे उचित स्वागत आम्ही केले. 'नवी बुलेट' हार परिधान करून आमच्या घरात विसावली. आम्हालाही आनंदाचे भरते आले.

प्रसादने प्रवास फार व्यवस्थित केला होता. गती नाही. ६०-७० किलोमीटर नंतर थांबायचे. काहीतरी खायचे असल्यास खायचे. दुपारी थोडी विश्रांती. त्यामुळे तो आला तेंव्हा फारसा कंटाळलेला, थकलेला नव्हता. कशाला धाडस हा संघर्षबिंदू संपला होता. उकल ही झाली होती.

(11/02/2004)


*** ***