Friday, September 25, 2009

eka mulaachi goshT

गेले अनेक दिवस डोक्यात एक कल्पना घोळत होती. ती म्हणजे दुसरी तिसरीत असताना अभ्यास न करणे, व्रात्यपणा करणे आणि त्याचा परिणाम म्हणून बाईंकडून किंवा सरांकडून रागावून घेणे अथवा छड्या खाणे, ही नित्याचीच बाब असते. हो, हो! माझा स्वत:चाही अनुभव कमी अधीक प्रमाणात असाच काहीतरी आहे. मान्य करायला काय हरकत आहे! तुमचा काय वेगळा होता काय? असो. तर मी म्हणत होतो की असे असताना शाळेबद्दल थोडीशी संमिश्र भावना लहानपणी असायची. त्याबद्दल दोन ओळी लिहायच्या असा विचार मनात घोळत होता. काल रात्री त्याला मूर्त स्वरुप द्यायचे ठरवले आणि त्या 'दोन ओळी' लिहून पूर्ण केल्या. त्या अशा...


एका मुलाची गोष्ट

ती पाहताच माझी शाळा
हृदयी जो धडका भरला
जणू बांधची वाटे फुटला
उरलेला धीरची सुटला

कारण की आठवते मजला
काही घोटाळाची झाला
गणिती पाठची दिधला
बाईंनी सोडविण्याला

खेळ-बाहुल्ल्या मधुनी
करण्याचा राहूनी गेला
नाही कारण द्यायायाला
काही उपाय नाही उरला
उरलेला धीरची सुटला

तो इतिहासाचा तास
तिथे सनावळी अनेक
पण स्मरणी नसेची एक
पडे प्रसंग समोर बाका
वर्गी गनिमाचाची धोका
हुरहूर वाटे मजला
उरलेला धीरची सुटला

दिले व्याकरणाचे पाठ
म्हणी घोका हा गृहपाठ
दिसे गुरुजींची छडी ताठ
म्हणती डोके हे की माठ?
आता तिच्याशी माझी गाठ
कसे उत्तर द्यावे त्यांला
प्रश्न भलता अवघड बनला
उरलेला धीरची सुटला

तोवर मज आठवली
ती देशपांड्यांची मनुली
अन वळलेली पाऊले
अलगद अशी थबकली

थांबूनी तेथे क्षणभर
शाळेकडेची वळली
तशी छडीची नी बाईंची
आठवण मागे सरली

पण हाय घातची झाला
वर्गाच्या दाराशीच
गुरुजींची पडली गाठ
ते पटकन झाले पुसते
अभ्यास करितशी का रे?
का हालवितो मुंडी नुसते?
का मुखीचा चंबू झाला?
मग मार असाची मिळाला
वाटे नकोची कळो कुणाला!

पण मनात मनुची गोष्ट
करी छडीचा घावही मस्त
असे म्हणून आत मी शिरलो
नकळत बाईंशीची भिडलो
मग क्रुद्ध बाईंनी केला
माझ्या पितरांचा उद्धार
समोर दिसला मजला
दिवसाचा भागाकार

कोप-याकडे मी वळता
सभोवार नजर ती फिरली
नजरेसच नाही पडली
ती देशपांड्यांची मनुली
कुठूनी बुद्धी सुचली
आणि शाळेवर मी आलो
झाला मोठा पश्चाताप
वर मनुचा राग अमाप

धरता धरता अंगठे
अश्रूंचा झाला पात
बैठका ही काढीवल्या
अहो मोजूनी त्याही सात
सारी पोरं फिदीफिदी हसली
इथे आमची स्वारी रुसली

मनु होती काल म्हणाली
आणीन हलवा उद्या डब्यातूनी
आणि ताईनी दिली तर
दोन मोरपिसे वहीतूनी

आज ती आलेली नाही
हलवान पिसे ही नाही
वर होई कानांची अन्
तळहातांची लाही लाही

थोड्या अवधी नंतरी
बाकावरी मोर्चा आमचा बसला
तिथे पिटपाट जनू फुदकला
कानी लागोनी हळुची म्हणाला
छकुली पहा ती लेल्यांची
बोलाविती आहे तुजला

तोवरी छोट्या सुट्टीची
घंटा ती घणघणली
आज डब्यात जम्मत आहे
धावत येता म्हणाली छकुली

ती अन् मी अन् जनू
बाहेर पाणी प्याया निघालो
भागाकारातील बाकी
नकळत विसरून गेलो
नकळत विसरून गेलो

***