Monday, September 29, 2008

jeevan

एका मित्राचा ओर्कुट वर स्क्रॅप आला. ती एक कविता होती. त्यामध्ये जीवनावर टिप्पणी होती. तशी काहीशी नकारात्मक. सहज वाटले की त्यात थोडी भर घालावी. पण लवकरच लक्षात आले की मी त्यात असमर्थ आहे. तरीही मनात काही विचार आले जे माझ्या प्रत्येक बाबीमध्ये सौंदर्य शोधणार्‍या वृत्तीशी साजेसे होते. ते विचार मी कागदावर उतरवायला सुरूवात केली. त्यातून या ओळी निर्माण झाल्या. या कवितेचे शीर्षक ठरवताना मी मुळच्या शिर्षकामध्ये थोडा बदल केला. साहजीकच तो बदल म्हणजे "सुंदर" या शब्दाची भर आहे.
*** *** ***

जीवन एक सुंदर गाणं असतं
गाणार्‍याचा सूर लागायचा अवकाश की
सुखातील दु:खानंतरच्या सुखातील अनुभूतीच्या
तंद्रीत घटकाभर हरवून जाणं असतं |

जीवन एक सुंदर गाणं असतं
कधी तलत मेहमूदचे अंतरंगी भिडणारे आर्त सूर
कधी किशोर रफीचं धुंद प्रीतकथन
अशा हिंदोळणार्‍या बहराचं येणं जाणं असतं |

जीवन एक सुंदर गाणं असतं
नुसतंच ऐकावं की तुम्ही खुलून गावं
हा तुमचा संभ्रम टाळण्यासाठी बनलेलं
शोलेमधल्या अमिताभचं गंमतशीर नाणं असतं |

जीवन
एक सुंदर गाणं असतं |

***