Pages

Tuesday, September 20, 2011

hasat raha

हसत रहा


हातावर हात ठेवून, गुडघ्यावर डोकं ठेवून
मिटलेल्या त्या डोळ्यांच्या, आडून जरा हसत असता

लपलेल्या अश्रूंनी, आणि बंद ओठांनी
 आतली ती मूक व्यथा, दबकत सांगत असता

तुला असं वाटतं का, दु:ख असं दाटतं का
कलंडलेल्या बरणीतलं पीठ, जमिनीवर साठतं का

दाटलं तर दाटून दे, साठलं तर साठून दे
उरातला कढ आता, गोठतोय तर गोठून दे

गोठलेल्या कढाचा आपण छान आलेपाक करू
नाहीतर घालून चिंच नि गूळ, त्याचा लालीपाप करू

तरीही जर कललेलं उन्ह, डोळ्यांना तुझ्या सुखवत नाही
पश्चिमेचा थंड वारा, रुसलेली कळी खुलवत नाही 

तर, मग मात्र असं कर, कागदाची एक होडी कर 
घरातून बाहेर पड पण, होडी जरा जपून धर

चालत रहा चालत रहा, नदीवरच्या पुलाकडे पहा
चालत रहा चालत रहा, पुलावरून नदीकडे पहा

आता पुन्हा चालू लाग, गाठ पुलापलीकडचा भाग
पाण्याकडे पहात पाय-या, घाटावरच्या उतरू लाग

पाण्यामध्ये पाय टाकून, मनाला कसे भिजून दे 
आता होडी हातात घे, आणि पाण्यामध्ये सोडून दे

होडी पाण्यात तरंगू लागेल, लाटांमध्ये डुलू लागेल
नव्या मैत्रिणींबरोबर, गुजगोष्टी करू लागेल

मग एक लाट अशी येईल, होडीला बरोबर नेईल
जाणा-या होडीकडे पहात रहा, गालातल्या गालात हसत रहा

*** ***