कोणत्या गोष्टीपासून प्रेरणा घ्यायची, अथवा कोणत्या व्यक्तिच्या जीवन चरित्रामुळे आपल्या मनावर सकारात्मक परिणाम होईल हे मुख्यत: आपल्या त्या त्या वेळच्या परिस्थितीवर व गत अनुभवांवर अवलंबून राहते. इतिहासातील कोणती तरी यशोगाथा एखाद्या व्यक्तीला प्राप्त परिस्थितीशी टक्कर देण्यास प्रवृत्त करेल. परंतु कदाचीत एखाद्या संवेदनशील मनास तीच यशोगाथा निराशेच्या गर्तेतही ढकलून देईल. प्रत्येक व्यक्तीची मानसीकता वेगळी असते, तसेच प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. वीर सावरकर मुंबई मधील डोंगरीच्या कारागृहामध्ये होते. वेळ आहे सन १९१० ची. नुकत्याच त्यांना दोन वेगवेगळ्या खटल्यांसाठी आजन्म कारावासाच्या दोन शिक्षा सुनावल्या गेल्या आहेत. याचा अर्थ असा की सुटका होणार १९६० मध्ये. सावरकरांचा लहानपणापासूनचा एक मानस - एक महाकाव्य लिहीणे. हाताशी ना लेखणी आहे, ना कागदाचा चिटोरा. कारण या गोष्टी कारागृहात बाळगणेही गुन्हा आहे. दुसरा कोणताही मार्ग दृष्टिक्षेपात नाही. आहे तो फक्त पुढील ५० वर्षांमधील दिसणारा अंधार. या परिस्थितीत त्यांना आठवतात ते श्री गुरू गोविंद सिंह. त्यांच्या 'माझी जन्मठेप' या पुस्तकातील संबंधीत उतारा.
गोविंदसिंहाचे चरित्र
... प्रत्यही कमीत कमी दहा ते वीस कविता नव्या रचून आणि जुन्यावर आवृत्ति देऊन पाठ करण्याचा जर प्रघात ठेवला तर एक वा अर्ध लक्ष (ओळींचे) महाकाव्य रचणे संभवनीय आहे तर मग आजच प्रारंभ. प्रथम श्रीगुरूगोविंदसिंहाचे चरित्र गावयाचे.
कारण गोविंदसिंह हुतात्म्यांचा मुकुटमणी होता. थोर यशाने मंडित झालेले थोर पुरुष राजप्रासादांच्या सुवर्णकलशाप्रमाणे तेज:पुंज दिसतातच. पण आज मला त्यांच्या चरित्रवर्णनाने, त्यांची ती यशोगीतें गाईल्याने, तितकी शांति न मिळता उलट माझ्या कपाळी आलेल्या अपयाशाची तीव्रता मात्र अधिक जाचू शकण्याचा संभव आहे. आज मला त्या यशाच्या राजप्रासादाच्या पायाखाली खोल दडपून गेलेल्या अपयशाच्या पायाचे चिंतन हे ध्येय आहे. म्हणून 'चमकोर' दुर्गातून निसटताना ज्याचा संपूर्ण पराभव झालेला आहे, ज्याचे मातापत्नीपुत्र वाताहात होऊन संसाराची राखरांगोळी उडाली आहे, ज्याच्या शिष्यांनीही त्याच्यावर शपथपूर्वक ठेवलेल्या निष्ठेचे त्यागपत्र देऊन आयत्या वेळेस त्यास सोडून त्या पराभवाचे व अपयशाचे खापर त्याच्याच डोक्यावर फोडलेले आहे आणि तरीहि जो सिंह ते अपयशाचे व दु:खाचे हलाहल एकाद्या रुद्रासारखा अवतार धारण करून पचविता झाला, त्या गोविंदसिंहाचे ते अपयशच आज मला गेय आहे! या माझ्या भयंकर दु:खास व अपजयास ते मेरुदंडाप्रमाणे आधार होईल. माझ्या पिढीच्या अपयशाच्या, दु:खाच्या पराजयाच्या खोल पायावर भावी पिढ्यांचे यश:प्रासाद ते उभवील!
भावनांच्या मनो-यावर चढून माझे मन दूरवरची दृश्ये पाहण्यात रंगून गेले असता इकडे माझे हात ते काथ्याचे कठीण नाडे व च-हाटे तोडण्यात, कुटण्यात, उकलण्यात गुंतलेले होते. प्रत्यहींच्या म्हणून ठरलेल्या दहा पंधरा आर्या रचून झाल्या, काथ्या उलगडणेहि संपले! पण हातहि सोलून निघाले, फोड उठले, रक्त गळू लागले.
डोंगरीच्या बंदीगृहात, हेगच्या निकालानंतर किती दिवस होतो आठवत नाही. प्रात:काळी उठावे, व्यायामासाठी फिरताना योगसूत्रे मुखोद्गत म्हणावीत त्यावरील एकेकावर अनुक्रमे विचार करावा; मग सक्त श्रमाचे म्हणून कठीण काम दिलेले असेल ते करावे आणि ते करतानाच मनात दहाबारा नवीन कविता रचून व जुन्या पाठ झालेल्या आवृत्ति देऊन संध्याकाळी जेवण झाल्यावर तुरुंग बंद करून सर्व सामसूम झाली असता ध्यानधारणेचा काही अभ्यास साधावा व रात्री नऊ वाजण्याचे आतच निजावे. झोप मात्र गाढ लागे. एकलकोंडीतील हा कार्यक्रम चालला असता कधी कधी 'प्रवृत्तिचिये राजबिंदी | पुढा बोधाचिये प्रतिपदी | विवेकदृश्याची मांदी' (ज्ञानेश्वरी: अध्याय १८: ओव्या १०६९-७०) सारीत राहण्याची अटोकाट खटपट करीत असतानाहि चिंतेची व उद्वेगाची धाड एकाएकी कोसळून जसा काही गळा चेपला जावा, जीव कासावीस होऊ पाहावा. वाटे, आपल्यामागे कार्याचे काय होईल..... जर..... मग हेहि कष्ट..... पण क्षणभरात चमनाचा तोल पुन: संभाळला जावा.
- माझी जन्मठेप, लेखक: विनायक दामोदर सावरकर (१८८३-१९६६)
*** ***